
परभणी, 12 एप्रिल (हिं.स.)।
येथील सर्वधर्मीय फुले-शाहू-आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित त्रैभाषिक कवी संमेलनातून क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले. विविध भाषांतील कवींनी सामाजिक, मानवतावादी व परिवर्तनवादी विचार कवितांमधून प्रभावीपणे मांडले.
महोत्सवाचे निमंत्रक यशवंत मकरंद यांनी “जगणे शोषितांचे तुम्हीच बदलले सारे, आता त्यांच्या मुठीत सूर्य-चंद्र तारे...” या ओळींतून आपल्या भावना व्यक्त करत फुले यांच्या कार्याचा गौरव केला.
कवी संमेलनाचे अध्यक्ष इंजि. डॉ. विवेक जनार्दन मवाडे यांनी ‘मुडदे’ या कवितेतून समाजातील निष्क्रियतेवर प्रखर टीका केली. “मुडदे असतात आपल्या आजूबाजूला... शहरात, गावात आणि घरात सुद्धा” या ओळींनी त्यांनी विचारप्रवृत्त संदेश दिला.
यावेळी विविध कवींनी देशप्रेम, सामाजिक समता, शिक्षणाचे महत्त्व व अन्यायाविरुद्ध लढा या विषयांवर कविता सादर केल्या. “मेरा हिंदुस्तान प्यारा हिंदुस्तान...” या कवितेद्वारे देशातील कर्तृत्ववान व्यक्तींना मानवंदना देण्यात आली, तर सौ. सविता वडगावकर यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी समाजात घडवलेल्या परिवर्तनाचा उल्लेख केला.
संतोष नारायण यांनी “द्रोणाचार्यच भेटले पदोपदी... एकलव्यवाणी मीच माझा गुरु झालो” या कवितेतून स्वावलंबनाचा संदेश दिला.
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis