मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ता योजना लातूर ग्रामीण विधानसभा क्षेत्र समिती गठीत
- अध्यक्षपदी आ. रमेशअप्पा कराड तर समीतीत पाच जणांचा समावेश लातूर, 12 एप्रिल (हिं.स.)। राज्यातील भाजपा महायुती शासनाने नव्याने सुरू केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशअप्पा
आमदार रमेश कराड


- अध्यक्षपदी आ. रमेशअप्पा कराड तर समीतीत पाच जणांचा समावेश

लातूर, 12 एप्रिल (हिं.स.)।

राज्यातील भाजपा महायुती शासनाने नव्याने सुरू केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशअप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली लातूर ग्रामीण विधानसभा क्षेत्राची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत विविध विभागातील अधिकाऱ्यांसह पाच शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

ग्रामीण भागात शेतक-यांना सातत्याने अडचणीचा आणि त्रासदायक ठरणारा शेत रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजना सुरू केली असून या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आणि योजनेचे सनियंत्रण व समन्वय साधण्यासाठी आमदार महोदयाच्या अध्यक्षतेखाली विधानसभा क्षेत्रात समिती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

शासनाच्या निर्णयानुसार लातूर ग्रामीण विधानसभा मतदार क्षेत्रासाठी आ. रमेशअप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजना समिती गठीत करण्यात आली असून या समितीत सचिव उपविभागीय अधिकारी लातूर, सहसचिव उपविभागीय अधिकारी औसा रेणापूर, समिती सदस्यात शेतकरी प्रतिनिधी अनिल भाऊसाहेब भिसे, सुकेश किशनराव भंडारे, सुरज जगन्नाथ शिंदे, दीपक भागवत वागस्कर, राजकिरण माणिकराव साठे त्याचबरोबर संबंधित क्षेत्रातील गटविकास अधिकारी, उपअधीक्षक भूमि अभिलेख, वनपरिक्षेत्र अधिकारी, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम, उप अभियंता जिप बांधकाम आणि पसचे लेखाधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे.

सदरील मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजना समिती योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी, योजनेचे सनियंत्रण व समन्वय साधण्या बरोबरच ज्या ठिकाणी रस्ते अतिक्रमण केले आहेत अशा ठिकाणीची अतिक्रमणे काढणे, कार्यकारी यंत्रणेची निवड करणे, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड, एका गावाहून दुसऱ्या गावात जाणाऱ्या अधिक लांबीच्या शेत रस्त्याचे ग्रामीण रस्त्यात रूपांतर करून ग्राम विकास विभागाकडे रस्त्याची शिफारस करणे यासह रस्त्याच्या अनुषंगाने कार्य करणार आहे.

या समितीत निवड झाल्याबद्दल समिती अध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी सदस्य अनिल भिसे, सुकेश भंडारे, सुरज शिंदे, दीपक वांगस्कर, राजकारण साठे यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande