
मुंबई, 12 एप्रिल (हिं.स.) - ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी श्रद्धांजली संदेश देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
स्वरांचा 'सप्तक' पोरका;
अभी ना जाओ छोड कर.....
आशाताईंच्या जाण्याने संगीताचा सुवर्णकाळ हरपला - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भारतीय संगीत सृष्टीतील अढळ ध्रुवतारा आणि आपल्या सुरावलींनी अवघ्या जगाला मोहिनी घालणाऱ्या 'पद्मविभूषण', महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या निधनामुळे देशाने एक महान स्वरसम्राज्ञी गमावली आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता आशाताईंच्या जाण्याने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणतात.
आशाताईंच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी व्यक्त करताना उपमुख्यमंत्री म्हणाले, आज प्रत्येक रसिकाच्या मनात एकच आर्त साद उमटत आहे अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नहीं. आशाताईंनी त्यांच्या गाण्यांनी आपल्याला इतकं समृद्ध केलं की, त्या कधीतरी आपल्याला सोडून जातील ही कल्पनाच सहन होत नाही. त्यांच्या आवाजातील तोच उत्साह आणि तीच तरलता आता पुन्हा कधीच ऐकायला मिळणार नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रतिक्रियेत पुढे म्हणतात, आशाताई गेल्यामुळे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या प्रत्येकाला कोणीतरी आपल्या परिवाराचा सदस्य गमावल्याचे दुःख आज होत आहे.
आशाताई म्हणजे केवळ एक गायिका नव्हत्या, तर त्या संगीतातील चैतन्याचा झरा होत्या. भक्तीगीत असो, लावणी असो किंवा पाश्चात्य ढंगाची गाणी, प्रत्येक सुरात त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. सर्वाधिक गायनाचा विक्रम करून त्यांनी गिनीज बुक मध्ये आपलं नाव नोंदवलं. प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले ही जिद्द आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
महाराष्ट्र आणि मराठी मातीवर त्यांचे अतोनात प्रेम होते. मराठी भावगीतांना त्यांनी जे वैभव मिळवून दिले, त्यासाठी महाराष्ट्र सदैव त्यांचा ऋणी राहील.
त्यांच्या जाण्याने भारतीय संगीताचा एक सुवर्णकाळ खऱ्या अर्थाने संपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
0000000
संगीत विश्वातील सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, आशा भोसले यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य, विविधता आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती. हिंदी, मराठीसह विविध भारतीय भाषांमधील हजारो गाण्यांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘इन आंखों की मस्ती’, ‘चुरा लिया है तुमने’ यांसारखी असंख्य गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांच्या गायकीत आधुनिकतेसोबतच पारंपरिकतेचा सुंदर संगम दिसून येतो.
आशा भोसले यांचा संगीत प्रवास म्हणजे कठोर परिश्रम, सातत्य आणि कलेप्रति असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील श्रोत्यांना आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध केले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत आशा भोसले यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. आपल्या कर्तृत्वाने संगीत क्षेत्रात त्यांनी मानाचे स्थान निर्माण केले. त्यांच्या अद्वितीय योगदानामुळे त्यांना जागतिक स्तरावरही विशेष ओळख मिळाली होती.
आशा भोसले यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी