
परभणी, 12 एप्रिल (हिं.स.)।
“पंचपरिवर्तन” या संकल्पनेअंतर्गत सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, स्वबोध, नागरिक कर्तव्य आणि पर्यावरण संरक्षण या पाच महत्त्वाच्या घटकांवर सविस्तर भाष्य केले. समाजात जात, पंथ, भाषा व प्रांत या भेदांवर मात करून एकात्मता निर्माण करण्याचे आवाहन शिवप्रसाद कोरे यांनी केले.
येथील सिद्धिविनायक नगरातील सिद्धिविनायक मंदिरात आयोजित भव्य हिंदू संमेलनात प्रमुख वक्ते शिवप्रसाद कोरे यांनी “पंचपरिवर्तन” या विषयावर सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज झाडगावकर, विभाग संघचालक डॉ. रामेश्वर नाईक, नगर कार्यवाह विजय हैद्राबादे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कोरे म्हणाले की, संयुक्त कुटुंब पद्धती ही भारतीय संस्कृतीची ताकद असल्याचे सांगताना त्यांनी कुटुंबातील संस्कार जपण्यासाठी दररोज काही वेळ मोबाईलपासून दूर राहून कुटुंबासोबत वेळ घालवण्याचे आवाहन केले. “कुटुंब मजबूत असेल तर समाज आणि राष्ट्रही मजबूत राहते,” असे त्यांनी नमूद केले. स्वबोधाच्या माध्यमातून प्रत्येकाने स्वतःची ओळख, संस्कृती व इतिहास जाणून घेतला पाहिजे, असे सांगत त्यांनी नागरिक कर्तव्यांचे पालन, मतदान, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारी यांवरही भर दिला. पर्यावरण संरक्षणाच्या संदर्भात त्यांनी वृक्षारोपण, जलसंवर्धन, प्लास्टिकमुक्त जीवनशैली आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व अधोरेखित केले. गोआधारित शेतीद्वारे विषमुक्त अन्ननिर्मिती करून निरोगी भारत घडविण्याचे आवाहन त्यांनी केले.
जीवनशैलीतील ‘भवन, भोजन, भजन, भूषा, भाषा आणि भ्रमण’ या सहा घटकांवर मार्गदर्शन करत त्यांनी कुटुंबात एकत्रित भोजन, साप्ताहिक भजन, मातृभाषेचा अभिमान आणि संस्कृतीशी सुसंगत जीवनशैली यावर भर दिला. भारतीय संस्कृतीचा गौरव करताना त्यांनी भगवान राम व भगवान कृष्ण यांच्या आदर्शांचा उल्लेख केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
यावेळी हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज झाडगावकर यांनी हिंदू धर्मातील आचारपद्धती व गोसंवर्धनाचे महत्त्व स्पष्ट करत नैसर्गिक शेतीवर विशेष भर दिला.
या भव्य कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. “पंचपरिवर्तन” हा समाज व राष्ट्र परिवर्तनाचा प्रभावी मार्ग असल्याचा संदेश या संमेलनातून देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis