अमरावतीत बनावट ‘कृषिरत्न गुणीजन’ पुरस्काराच्या नावाखाली कुटुंबाची फसवणूक; गुन्हा दाखल
अमरावती, 12 एप्रिल (हिं.स.)। बनावट कृषिरत्न गुणीजन पुरस्कार वितरणाचे आयोजन करून वडील, विवाहित मुलगी आणि जावई, अशा तिघांची फसवणूक करण्यात आल्याची घटना शहरात घडली. गाडगेनगर ठाण्यात याप्रकरणी संशयिताविरुद्ध फसवणूक व विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल करण
अमरावतीत बनावट ‘कृषिरत्न गुणीजन’ पुरस्काराच्या नावाखाली कुटुंबाची फसवणूक; गुन्हा दाखल


अमरावती, 12 एप्रिल (हिं.स.)। बनावट कृषिरत्न गुणीजन पुरस्कार वितरणाचे आयोजन करून वडील, विवाहित मुलगी आणि जावई, अशा तिघांची फसवणूक करण्यात आल्याची घटना शहरात घडली. गाडगेनगर ठाण्यात याप्रकरणी संशयिताविरुद्ध फसवणूक व विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

कृष्णाजी दामाजी जगदाडे, असे फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, तिलकनगर, चेंबूर मुंबईचे अध्यक्ष असल्याचे सांगण्यात येते. कृषी महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापकाने ही तक्रार नोंदविली आहे. सेवानिवृत्तीनंतर प्राध्यापक हे सोशल मीडियावर सक्रिय होते. सोशल मीडियावरूनच वृद्ध प्राध्यापकाची ओळख संशयित कृष्णाजी जगदाडे यांच्यासोबत झाली होती. निवृत्त प्राध्यापक यांना झूम अॅपबद्दल माहिती होती. संशयिताने झूम मीटिंग घेऊन अस्तित्वात नसलेल्या पुरस्कारासंदर्भातील माहिती सेवानिवृत्त प्राध्यापकाला दिली. फसवणूक करण्याच्या उद्देशाने संशयिताने खोटे व अस्तित्वात नसलेले कृषिरत्न गुणीजन पुरस्कार पाठवून वृद्ध व त्यांच्या कुटुंबीयांना सिंगापूर दौऱ्यावर नेणार असल्याची बतावणी केली.

त्यात सहभागी होण्याचे आवाहन सेवानिवृत्त प्राध्यापक व त्यांच्या कुटुबीयांना केले. त्यामुळे सेवानिवृत्ताने त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया नवसारी येथील खात्यातून संशयिताने दिलेल्या बँक खात्यावर एक लाख ६६ हजार २०० रुपये पाठविले. निवृत्त प्राध्यापकांचे जावई यांनीसुद्धा स्टेट बँक ऑफ इंडियातून ४२ हजार रुपये, तर मुलीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून एक लाख ९५ हजार ८००, असे एकूण चार लाख चार हजार रुपये फोन पे वरून संशयिताच्या खात्यावर पाठविले. संशयित जगदाडे यांनी कृषिरत्न गुणीजन पुरस्कार वितरण सोहळ्याचे खोटे आयोजन केल्याबाबतचे आश्वासन देऊन व खोटे पुरस्कार पाठवून सेवानिवृत्त प्राध्यापक, त्यांची मुलगी आणि जावई या तिघांची फसवणूक केली, असा आरोप निवृत्त प्राध्यापकाने गाडगेनगर ठाण्यात दाखल तक्रारीत केला आहे. त्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande