परभणीतील ग्रामीण भागात गॅस तुटवडा; सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा
परभणी, 12 एप्रिल (हिं.स.)। बोरी परिसरात घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत असून, वेळेवर गॅस उपलब्ध होत नसल्याने गॅसधारक
अ


परभणी, 12 एप्रिल (हिं.स.)।

बोरी परिसरात घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत असून, वेळेवर गॅस उपलब्ध होत नसल्याने गॅसधारक चिंतेत आहेत.

माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून, ग्रामीण भागात तब्बल ४५ दिवसांनी तर शहरी भागात सुमारे २५ दिवसांनी गॅस मिळत आहे. गॅस बुक केल्यानंतर ओटीपी येऊनही ग्राहकांना ७-८ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत.

ग्रामीण गॅस एजन्सीकडे मोठ्या प्रमाणात ग्राहकसंख्या असताना केवळ ४०० ते ५०० सिलेंडरच काही दिवसांच्या अंतराने मिळत असल्याने मागणी-पुरवठ्यात तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांना वेळेवर गॅस मिळत नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, शासनाकडून गॅस दरात झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण वाढला आहे. काही ठिकाणी नियमांनुसार मोफत घरपोच सेवा देणे अपेक्षित असताना अतिरिक्त ३० रुपये आकारले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. तसेच तुटवड्याच्या कारणास्तव घरपोच सेवा बंद करून ग्राहकांना एजन्सीवर येण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोपही होत आहे. याशिवाय, काही किरकोळ विक्रेते गॅस सिलेंडर जास्त दराने विक्री करत असल्याने ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याचेही समोर आले आहे.

गॅस तुटवड्याचा फटका ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनावरही बसत असून, लग्नसमारंभ, सण-उत्सव तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी गॅस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना लाकडी इंधनाकडे वळावे लागत आहे. विशेषतः लग्नकार्यांसाठी स्वयंपाकाची व्यवस्था करताना वधूपित्यांची मोठी अडचण होत असल्याचे चित्र आहे.

या सर्व परिस्थितीकडे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा, तसेच अनियमितता करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande