आशाताईंना राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
मुंबई, 12 एप्रिल (हिं.स.) - ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. आशा भोसले सिद्धहस्त व प्रतिभासंपन्न गायिका : राज्यपाल जिष्णु देव वर्मा महाराष्ट्राच
आशाताईंना राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली


मुंबई, 12 एप्रिल (हिं.स.) - ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आशा भोसले सिद्धहस्त व प्रतिभासंपन्न गायिका : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आशा भोसले या देशातीलच नाही तर संगीत विश्वातील सिद्धहस्त आणि प्रतिभासंपन्न पार्श्वगायिका होत्या. आपल्या अवीट स्वरांनी, विविध संगीत प्रकार लीलया गाण्याच्या क्षमतेने आणि संगीतातील व्यापक योगदानामुळे त्यांनी संगीत रसिकांच्या अनेक पिढ्यांवर राज्य केले.

आपल्या जवळपास आठ दशकांच्या सांगीतिक कारकिर्दीत त्यांनी विविध भाषा व संगीत प्रकारांमध्ये असंख्य अजरामर गीते सादर करून भारताच्या सांस्कृतिक परंपरेला समृद्ध केले. आशाजींची भावोत्कटता व कलेप्रती बांधिलकी भावी पिढ्यांमधील कलाकार आणि रसिकांना प्रेरणा देत राहील. ‘जो भी है बस यही एक पल है’ हे त्यांचे गाजलेले गीत त्यांच्या जीवनाचे तत्वज्ञान झाले होते. आशाजींच्या निधनामुळे संगीत विश्वाचे, विशेषतः महाराष्ट्र राज्याचे, कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. आशाजींचा विवाह आर. डी. बर्मन यांच्याशी झाल्यामुळे त्यांचा आमच्या घराण्याशी देखील निकटचा संबंध होता.

या दुःखद प्रसंगी मी महाराष्ट्रातील जनतेच्या तसेच आपल्या स्वतःच्या वतीने दिवंगत आशाजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना तसेच संपूर्ण संगीत क्षेत्राला आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

00000000

मंगेशकर घराण्यातील आणखी एक तारा निखळला - मुख्यमंत्री

तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्‍या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि देशभरातील असंख्य चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.

आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्‍या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी, हिंदी, बांगलासह 20 भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये 12,000 वर गाणी त्यांनी गायली. ‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्‍या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, त्यांनी आग्रह करुन ‘अभी ना जाओ छोडकर...’ हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते आणि ‘पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले’, असे म्हणाल्याही होत्या. त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande