
रायगड, 12 एप्रिल (हिं.स.)। रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवत ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल 6 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 29 मार्च 2026 ते 7 एप्रिल 2026 दरम्यान फिर्यादी (रा. बेलोशी, ता. अलिबाग) यांच्याशी आरोपी महिलेने फेसबुकवरून मैत्री केली. त्यानंतर व्हॉट्सअॅपद्वारे सतत चॅटिंग व व्हॉईस कॉल करून विश्वास संपादन केला. पुढे जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत आरोपीने फिर्यादीला एका लिंकवर क्लिक करण्यास सांगितले.
सदर लिंकच्या माध्यमातून फिर्यादीकडून यूपीआयद्वारे वेळोवेळी पैसे उकळण्यात आले. अखेर एकूण 6,16,113.40 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 46/2026 अन्वये माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 (सुधारित 2008) कलम 66 (d) तसेच भारतीय न्याय संहिता 2023 कलम 318 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)