परभणी : सोनपेठेत महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 1250 रुग्णांची तपासणी
परभणी, 12 एप्रिल (हिं.स.)। सोनपेठ येथील दीपस्तंभ प्रतिष्ठान व हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच कै. राजेभाऊ दादाराव कदम यांच्या जयं
अ


परभणी, 12 एप्रिल (हिं.स.)। सोनपेठ येथील दीपस्तंभ प्रतिष्ठान व हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच कै. राजेभाऊ दादाराव कदम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी पार पडलेल्या या शिबिरात तालुक्यातील एकूण 1250 रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. मुंजाभाऊ धोंडगे, लक्ष्मण धोंडगे, जयप्रकाश बचाटे, मुख्याधिकारी रामप्रसाद यादव, गटनेते हाजी सद्दाम हुसेन, अजय देशमुख, नगरसेवक विश्वजीत कदम तसेच शहर परिवर्तन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे विविध आजारांवर रुग्णांना मार्गदर्शन व औषधोपचार करण्यात आले. यामध्ये नेत्र तपासणीसाठी 590, हाडांच्या तपासणीसाठी 320, दमा व श्वसनविकारांसाठी 150, कान-नाक-घसा तपासणीसाठी 130 तर लहान मुलांच्या तपासणीसाठी 40 रुग्णांनी लाभ घेतला. याचबरोबर रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले.

शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे तपासणीनंतर 140 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून, कॅन्सर, किडनी विकार, मणक्याचे आजार व इतर गंभीर आजार असलेल्या 42 रुग्णांच्या पुढील उपचारांचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

तसेच रक्तदान शिबिरात 20 दात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. नगर परिषद सोनपेठ, हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ व दीपस्तंभ प्रतिष्ठान यांच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत असून, ग्रामीण व शहरी भागातील गरजू रुग्णांना एकाच ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व मोफत उपचार मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या शिबिराचे नियोजन नगराध्यक्ष कदम व सोनपेठ शहर परिवर्तन विकास आघाडीच्या सर्व नगरसेवक, जनसेवक व कार्यकर्त्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande