
रत्नागिरी, 12 एप्रिल, (हिं. स.) : सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान असलेले उमरे (ता. जि. रत्नागिरी) येथील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व रवींद्र गोपीनाथ भाट्ये (वय ८५) यांचे आज (१२ एप्रिल २०२६) सकाळी पावणेआठच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले.
रवीदादा भाट्ये यांनी आपल्या स्वभावामुळे आणि काम करण्याच्या गुणामुळे अनेक गावांमध्ये अनेक माणसे जोडली. पाली येथील श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थान आणि नंतर मठमध्ये नव्याने उभारलेले श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थान या संस्थांशी ते जवळून संबंधित होते. जुने अभंग, आरत्या, भोवत्यांची पदे त्यांना मुखोद्गत होती. अनेक मंदिरांच्या पारंपरिक उत्सवांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असे. अगदी अखेरपर्यंत ते कार्यरत होते. मठ इथल्या लक्ष्मीपल्लीनाथाच्या मंदिरातील यंदाच्या चैत्रोत्सवाची सांगता तीन एप्रिल रोजी झाली. या उत्सवातही ते सहभागी झाले होते आणि या वयातही बुवांसमोर जमिनीवर बसून कीर्तनाचा आनंद घेत होते.
रवीदादांच्या अचानक झालेल्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला असून, मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना रत्नागिरी, लांजा तालुक्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी असलेल्या त्यांच्या सुहृदांकडून व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी