
परभणी, 12 एप्रिल (हिं.स.)।
गंगाखेड तालुक्यातील नरळद येथील निवासी वस्तीगृहातील विद्यार्थी रितेश राजाराम कदम याचा गोदावरी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्या प्रकरणी वसतिगृह चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन गंगाखेड शहरातील खाजगी निवासी वस्तीगृहांची चौकशी करण्याची मागणी किसानसभेच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी पोलीस निरीक्षक गंगाखेड यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटे आहे की, सुर्यनंदा प्रतिष्ठान निवासी वस्तीगृहातील विद्यार्थी रितेश राजाराम कदम याचा गोदावरी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी खाजगी वस्तीगृह चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करावी. ही घटना निवासी वस्तीगृह चालकांच्या हलगर्जीपणामुळे घडून आली असून ग्रामीण भागातील गरीब व अत्यल्प उत्पन्न असलेले शेतकरी मुलांना शिक्षणाच्या सोईसाठी निवासी वस्तीगृहांमध्ये मुलांना शिक्षणासाठी ठेवतात. फी घेऊनही वस्तीगृहात राहणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी निवासी वस्तीगृह उचलित नाहीत, एकाच खोलीत विद्यार्थ्यांचा कोंडवाडा केला जातो, पुरेशा भौतिक सुविधेचा अभाव, दर्जेदार जेवन व स्वच्छतेकडे दुर्लक्ष यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबणा होते. अशा प्रकारचे वसतिगृह संचालक विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करतात. तसेच पालकांचे आर्थिक शोषण केले जाते. शहरातील अनेक वस्तीगृहे बेकायदेशीर चालवली जात आहेत, यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.
निवेदनावर कॉ. ओंकार पवार, सुरेश इखे, संतोष जाधव, अंकुश कांबळे अनंत बर्वे, प्रशांत बर्वे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
_________
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis