
रत्नागिरी, 12 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी प्रवाशांच्या सवलतीसाठी लागणारे स्मार्टकार्ड काढण्यासाठी प्रवाशांना माखजन (ता. संगमेश्वर) एसटी बसस्थानकावरच ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.हे कार्ड मिळवण्यासाठी प्रवाशांकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. तसेच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि ओटीपी मिळवण्यासाठी जवळ चालू मोबाइल क्रमांक असणे गरजेचे आहे.
एसटी प्रशासनाने स्पष्ट केल्यानुसार, या कार्डच्या माध्यमातून विविध प्रवर्गातील लोकांना प्रवासात सवलत मिळणार आहे. त्यात १२ ते ७५ वयोगटातील महिला, ७५ वर्षांवरील महिला आणि पुरुष, ६५ ते ७५ वयोगटातील पुरुष यांचा समावेश आहे. भविष्यात सवलतीचा लाभ मिळवताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी पात्र प्रवाशांनी लवकरात लवकर आपले स्मार्ट कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. माखजन परिसरातील ग्रामीण भागातील प्रवाशांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी