
डोंबिवली, 12 एप्रिल (हिं.स.)।
केडीएमसी पालिका घनकचरा व्यवस्थापण विभाग व आरोग्य विभागाने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करणे आवश्यक असताना त्या कामाकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांची भाजपा नगरसेविका ज्योती पाटील व भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष पवन पाटील यांनी चांगलीच कानउघडणी केली. वारंवार तक्रार करूनही कोपरगाव येथील नालेसफाई केली नाही त्यामुळे पाटील यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याला जागेवर बोलावून वस्तुस्थिती दाखविली. नालेसफाई झाली नाही तर पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी जाईल. याला जबाबदार कोण? असा जाब विचारून पाटील यांनी अधिकाऱ्याला शाल व श्रीफळ देऊन उपहात्मक सत्कार केला.
परिस्थिती एकूण काय आहे याची प्रत्यक्ष माहिती अधिकाऱ्यांना व्हावी म्हणून भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष पावन पाटील हे स्वतः गटारात उतरले. त्यांनी फावड्याने नाले साफ करून नाल्यात किती माती, गाळ व दगड आहे हे त्या अधिकाऱ्याला दाखविले. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक झालो असून नागरिकांना उत्तरं देणे आमचे काम आहे. पालिकेचा हा दुर्लक्षितपणा जनतेला दिसला पाहिजे असे भाजपा नगरसेविका ज्योती पाटील स्पष्ट केले.
याबाबत अधिक माहिती देताना महाराष्ट्र भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष पवन पाटील म्हणाले, साधारण एक महिन्यापूर्वी अधिकाऱ्यांची वेळ घेऊन कोपरगावातील सर्व गटारे साफ झाले नाहीत असे पालिका प्रशासनाला सांगितले होते. मात्र तरीही फक्त आश्वासन दिले गेले. प्रत्यक्षात गटारे साफ झालीच नाहीत. शनिवारी आरोग्य अधिकाऱ्याला जागेवर बोलावून गटारे साफ झाली नाहीत हे दाखवून देण्याकरता मी स्वतः गटारात उतरलो आणि फावड्याने गटारातील गाळ, माती बाहेर काढली. एकही गटार साफ न केल्याने अधिकाऱ्याचा शाल व श्रीफळ देऊन उपहासत्मक सत्कार केला.
आता अशी अपेक्षा आहे की या सत्कारानंतर तरी पावसाळ्यापूर्वी कोपरगावातील सर्व गटारे पालिका प्रशासनाकडून साफ केली जातील अशी आशा आहे.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi