
छत्रपती संभाजीनगर, 12 एप्रिल (हिं.स.)। शिवसेना नेते
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथील देओळाई येथे आज छत्रपती संभाजीनगर आणि जालना या लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. कोट्यवधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले. बैठकीच्या सुरुवातीला त्यांना आदरांजली वाहिली.
नुकत्याच संपन्न झालेल्या नगरपंचायती, महानगरपालिका निवडणुकांमधील पक्षाची कामगिरी, यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्या अपेक्षा आणि त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी नुकत्याच राज्यातील संपर्कप्रमुखांच्या नेमणूका जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पक्ष बांधणीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
खासदार शिंदे म्हणाले,
सध्या राज्यात मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहीम (SIR) सुरू आहे. आपल्या मतदाराचे नाव यादीतून गहाळ होऊ नये, यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. ग्रामपंचायत, नगरपंचायत, पालिका, जिल्हा परिषद अशा प्रत्येक पातळीवर शिवसेना पक्ष घराघरात पोहोचवण्यासाठी यावेळी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार संदीपान भुमरे, सर्वश्री आमदार अब्दुल सत्तार, प्रदीप जयस्वाल, रमेश बोरनारे, आमदार संजना जाधव, शिवसेनेचे सचिव भाऊ चौधरी, छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे उप महापौर राजेंद्र जंजाळ, प्रवक्ते प्रकाश महाजन, लोकसभेतील सर्व उपनेते, विभागीय संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख, लोकसभा संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, संघटक, सर्व विभागाचे प्रमुख, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis