
सोलापूर, 12 एप्रिल (हिं.स.)।
संविधान हा या देशाचा आत्मा आहे. महात्मा बुद्ध, महात्मा बसवण्णा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हाच संविधानिक मूल्यांचा पाया आहे. मात्र धर्म केंद्रित राजकारण करणाऱ्यांकडून संविधानाला धोका निर्माण झाल्याचे सांगतानाच संविधानाच्या संरक्षणासाठी लोकलढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शंकर पाटील यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वसुंधरा महाविद्यालयात आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेत पाटील बोलत होते. 'जातविरहित समाजव्यवस्थेची संकल्पना : महात्मा बसवण्णा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान' या विषयावर पाटील यांनी भारतीय समाज व्यवस्था, समाजभान आणि आजची जबाबदारी असा पट सविस्तराने मांडला.महात्मा बसवंणानी 12 व्या शतकात समग्र परिवर्तनाची क्रांती केली. बसवंनानी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. जन्माच्या आधारावरील श्रेष्ठत्व नाकारून समतेची शिकवण दिली. कायकवे कैलास ही जीवन पद्धती सांगितली. म्हणजे श्रम हेच देव. श्रमाधिष्ठित जीवन पद्धती सांगितली. कामाला पूजेचे पावित्र्य दिले. दुर्दैवाने आजची व्यवस्था पूजा करणे हेच काम मानणारी आहे. कर्मकांडांचे उदात्तीकरण अतिशय नियोजनबद्धपणे सुरू असल्याची खंत ही पाटील यांनी व्यक्त केली. शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या पक्षांनीही धर्मनिरपेक्ष भूमिकेशी प्रतारणा केल्याने गांधींच्या पक्षात असलेले गांधींच्या मारेकऱ्यांच्या पक्षात सहज मिसळून जात असताना आपल्याला दिसत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड