
परभणी, 12 एप्रिल (हिं.स.)।
महानगरपालिकेला जीएसटीचे थकीत 73 कोटी 71 लाख रुपये अनुदान लवकरच प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात मंत्रालयात गठीत समितीची बैठक पार पडून अनुदान तात्काळ देण्याबाबत शिफारस करण्यात आल्याची माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली.
आ. डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करून परभणी महानगरपालिकेच्या जीएसटी थकीत अनुदानाचा प्रश्न आक्रमकपणे मांडला होता. मनपाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मांडण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर या विषयासाठी विशेष समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीची बैठक शुक्रवारी मंत्रालयात आमदार डॉ. पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.
बैठकीत परभणी महानगरपालिकेला जीएसटीचे 73 कोटी 71 लाख रुपये अनुदान देण्यास मंजुरीची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे हे अनुदान लवकरच मिळणार असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या महानगरपालिकेला मोठा दिलासा मिळणार असून, शहरातील विविध विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निर्णयाबद्दल महानगरपालिकेच्या वतीने आमदार डॉ. राहुल पाटील यांचे आभार मानण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis