
रत्नागिरी, 13 एप्रिल, (हिं. स.) : संगमेश्वर तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी संगमेश्वर रेल्वे स्थानकावर ९ साप्ताहिक गाड्यांना थांबा देण्याची मागणी कोकण रेल्वेचे रिजनल रेल्वे मॅनेजर शैलेश बापट यांच्याकडे करण्यात आली आहे. “निसर्गरम्य चिपळूण” व “निसर्गरम्य संगमेश्वर रेल्वे” फेसबुक ग्रुपच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले.
संगमेश्वर तालुका सुमारे १९६ गावांमध्ये विस्तारला असून पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मार्लेश्वर, कर्णेश्वर, प्रचीतगड, भवानी किल्ला तसेच छत्रपती संभाजी महाराज स्मारक, शृंगारपूर यांसारखी ऐतिहासिक व धार्मिक स्थळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करतात. त्यामुळे वर्षभर प्रवाशांची मोठी वर्दळ असते.
नेत्रावती एक्स्प्रेस, पोरबंदर एक्स्प्रेस आणि जामनगर एक्स्प्रेस या गाड्यांना संगमेश्वर थांबा मिळाल्यानंतर स्थानकावरील प्रवाशांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. यावरून संगमेश्वर स्थानकाचे वाढते महत्त्व अधोरेखित होते. मात्र अद्याप अनेक महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या न थांबल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
या पार्श्वभूमीवर केरळ संपर्क क्रांती एक्स्प्रेस, अमृतसर सुपरफास्ट एक्स्प्रेस, इंदूर सुपरफास्ट एक्स्प्रेस, हापा सुपरफास्ट एक्स्प्रेस, बांद्रा–मडगाव एक्स्प्रेस, श्रीगंगानगर एक्सप्रेस, जबलपूर–कोकण एक्स्प्रेस, दुरंतो एक्स्प्रेस आणि मरूसागर एक्स्प्रेस या नऊ गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या गाड्यांना थांबा दिल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. तसेच परिसराच्या विकासालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करत रेल्वे प्रशासनाने या मागणीची तात्काळ दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी