

‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करून दिली संपूर्ण जगाला माहिती
वॉशिंग्टन, 13 एप्रिल (हिं.स.) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर एक मोठा दावा करत आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवली आहे. अमेरिकन सैन्याने इराणच्या नौदलावर मोठा हल्ला करून तब्बल 158 नौसैनिक जहाजे नष्ट केल्याचे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.
यासंदर्भातील सोशल मिडीया पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इराणची नौसेना आता समुद्राच्या तळाशी असून जर इराणची कोणतीही नौका अमेरिकेच्या नाकेबंदीच्या जवळ आली, तर तिला तात्काळ नष्ट केले जाईल असा इशारा ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये दिला आहे. या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी असेही स्पष्ट केले की, इराणच्या तुलनात्मकदृष्ट्या लहान जहाजांवर हल्ला केलेला नाही. इराणच्या ‘फास्ट अटॅक शिप्स’ला मोठा धोका मानत नसल्यामुळे त्यांना या हल्ल्यात लक्ष्य बनवण्यात आले नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. तसेच ट्रम्प यांनी असे नमूद केले की, समुद्रमार्गे होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीवर कठोर कारवाई केल्यासारखीच ही कारवाई जलद आणि कठोर स्वरूपाची असेल. तसेच त्यांनी दावा केला की, समुद्रमार्गे अमेरिकेत येणाऱ्या 98.2 टक्के अंमली पदार्थांची तस्करी आता रोखली गेली आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या समुद्री व्यवहार संस्थेच्या प्रमुखांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, कोणत्याही देशाला आंतरराष्ट्रीय जलमार्गांमध्ये जहाजांची हालचाल थांबवण्याचा कायदेशीर अधिकार नाही. त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार “निर्दोष मार्गक्रमण” हा प्रत्येक देशाचा हक्क असल्याचे स्पष्ट केले. या संपूर्ण घडामोडींमुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाली आहे.
------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी