
लातूर, 13 एप्रिल (हिं.स.)।
नेपाळ सीमेजवळील बिहारच्या अररिया जिल्ह्यातून १६७ अल्पवयीन मुलांना पाटणा-पुणे एक्सप्रेसने लातूरमध्ये पाठवले जात होते. मध्य प्रदेशातील कटनी रेल्वे स्थानकावर आरपीएफने या मुलांना अडवून आता सखोल चौकशी सुरू केली आहे. एका सामाजिक संस्थेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मानव तस्करीच्या संशयातून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आरपीएफच्या एका अधिकाऱ्याने दिली.
ही मुले मदरशातील विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने मुलांच्या संशयास्पद स्थलांतरामुळे महाराष्ट्राची लोकसंख्याशास्त्रीय रचना बदलण्याचा हा कट तर नाही ना, अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.
बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी मुलांचे समुपदेशन सुरू केले आहे. बहुतांश मुले मुस्लिम समाजातील असून त्यांना मदरशांमध्ये प्रवेशासाठी नेले जात असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली.
80 मुलांना सध्या जबलपूर येथील बालगृहात पाठवण्यात आले आहे, तर उर्वरित मुलांना कटनी येथील बाल संरक्षण गृहात ठेवण्यात आले आहे. बाल कल्याण समिती, रेल्वे पोलिस आणि महिला व बाल विकास विभाग यांचे संयुक्त पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. मुलांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जात आहे. तपास पूर्ण झाल्यावरच प्रकरण मानवी तस्करीचे आहे की मुलांना कायदेशीर शैक्षणिक उद्देशांसाठी नेले जात होते हे समोर येईल अशी माहिती आरपीएफकडून देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis