
अमरावती, 13 एप्रिल (हिं.स.) : मध्यप्रदेशातून अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गोवंशाची तस्करी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर चांदूरबाजार पोलिसांनी मोठी कारवाई करत २० गोवंशीय जनावरांची सुटका केली. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून, दुसरा चालक फरार झाला आहे.
बाजाराचा दिवस असल्याने चांदूरबाजार परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यावेळी संशयित वाहनांची तपासणी करताना एमएच ०१ सीजे ४१३० क्रमांकाच्या कारमध्ये एक गाय आढळून आली. त्यानंतर एमएच ३० एए ०००७ क्रमांकाच्या मिनीट्रकची तपासणी केली असता, त्यात १९ गोवंशीय जनावरांना कोंबून वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.
या जनावरांपैकी काहींवर टॅग नव्हते, तर काहींवर बनावट टॅग असल्याचेही निदर्शनास आले. तसेच, काही जनावरे जखमी अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणात सय्यद मुजम्मील सय्यद आरीफ (वय २०, रा. रिहान पार्क, मोर्शी) याला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या वाहनाचा चालक वाहन सोडून फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक शुभम कुमार व परिवीक्षाधीन पोलिस अधीक्षक सागर भामरे यांच्या पथकाने केली.
राज्यात गोवंश वाहतूक आणि कत्तलीवर बंदी असतानाही मध्यप्रदेशातून तस्करी सुरू असल्याने अशा कारवायांमुळे या अवैध प्रकारांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी