
रत्नागिरी, 13 एप्रिल, (हिं. स.) : उन्हाळ्याची तीव्रता वाढताच तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असून संगमेश्वर तालक्यातील निवळी, सरंद आणि बेलारी या तीन गावांनी प्रशासनाकडे टँकरची मागणी केली आहे.
या गावांतील पाण्याचे स्रोत आटल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी मिळवण्यासाठी ग्रामस्थांना लांब अंतर पार करावे लागत असून दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे. टँकरची मागणी करूनही अद्याप प्रत्यक्ष पुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने तालुक्यासाठी टंचाई निवारण कृती आराखडा तयार केला आहे. यानुसार यंदा तालुक्यातील ७२ गावे आणि १७७ वाड्यांना पाणीटंचाईचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या उपाययोजनांसाठी सुमारे १ कोटी ३८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असल्याने आगामी काळात टँकरची मागणी करणाऱ्या गावांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून, सध्या तरी प्रभावित गावांतील ग्रामस्थांचे लक्ष प्रशासनाच्या टँकर पुरवठ्याकडे लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी