
रायगड, 13 एप्रिल (हिं.स.) : जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असून गेल्या वर्षभरात झालेल्या 652 अपघातांमध्ये तब्बल 259 जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातांमध्ये 598 जण गंभीर जखमी झाले आहेत.
वाहनचालकांची बेपर्वाई, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष आणि अवजड वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील वर्षांच्या तुलनेत अपघातांची संख्या किंचित घटली असली तरी मृत्यूंचे प्रमाण अद्यापही गंभीर असल्याचे दिसून येते.
२०२४ मध्ये 732 अपघातांमध्ये 266 जणांचा मृत्यू झाला होता, तर 2025 मध्ये आतापर्यंत 652 अपघातांमध्ये 259 जणांनी जीव गमावला आहे. चालू वर्षात फेब्रुवारीअखेरपर्यंतच 109 अपघातांत 40 मृत्यू झाल्याची नोंद आहे.
जिल्ह्यातून मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग यांसारखे महत्त्वाचे रस्ते जात असल्याने वाहतुकीचा ताण मोठा आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील सुरू असलेले रुंदीकरण काम, अरुंद रस्ते, तीव्र वळणे आणि घाटमार्गांमुळे अपघातांचा धोका अधिक वाढला आहे.
वेगमर्यादा न पाळणे, लेन शिस्त मोडणे, मद्यपान करून वाहन चालवणे तसेच चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत आहेत. विशेषतः घाट रस्त्यांवर ट्रक चालकांकडून वाहन न्यूट्रलमध्ये चालवण्यासारखे धोकादायक प्रकारही आढळत आहेत.
या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस आणि प्रशासनाने अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. सुट्टीच्या दिवशी अवजड वाहतुकीवर नियंत्रण, वेगमर्यादेची कडक अंमलबजावणी आणि वाहनचालकांचे प्रभावी प्रबोधन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
एकूणच, रायगडमधील वाढते रस्ते अपघात हे गंभीर आव्हान ठरत असून तातडीने ठोस उपाययोजना न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)