
रायगड, 13 एप्रिल (हिं.स.) : रायगड जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू करण्यात आलेली जिल्हा परिषदेची निर्बीजीकरण आणि लसीकरण मोहीम पूर्णपणे अपयशी ठरल्याचे समोर आले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही योजना तब्बल दोन वर्षांपासून ठप्प असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून, टोळक्यांनी हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण भीतीच्या छायेत जगत आहेत. दुचाकीस्वारांनाही या कुत्र्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
जानेवारी 2022 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत तब्बल 7,255 नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर 2024 मध्ये जिल्हा परिषदेने निर्बीजीकरण, शस्त्रक्रिया आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू केली होती. या कामाची जबाबदारी पुण्यातील ‘युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर’ संस्थेला देण्यात आली होती.
25 लाख रुपयांच्या निधीतून सुरू झालेल्या या मोहिमेत प्रत्यक्षात केवळ 260 कुत्र्यांवरच उपचार करण्यात आले. सुमारे 3.29 लाख रुपये खर्च झाल्यानंतर ठेका संपताच मोहीम बंद पडली. त्यानंतर पुढील निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा विषय दुर्लक्षित राहिला.
परिणामी, उर्वरित निधी वापरात न आल्याने समस्या अधिकच गंभीर बनली आहे. नव्या अर्थसंकल्पात पुन्हा 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असली तरी, विषय समितीची मंजुरी आणि निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ही योजना पुन्हा कागदावरच राहणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न अधिकच बिकट बनला असून, तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)