
परभणी, 13 एप्रिल (हिं.स.)।
पूर्णा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच बँक ऑफ महाराष्ट्र आणि इतर बँकांच्या एटीएममध्ये मागील चार-पाच दिवसांपासून रोख रक्कम उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे दि. १४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पूर्वीच एटीएम सेवा ठप्प झाल्याने शहरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील प्रमुख ठिकाणच्या एटीएमवर दररोज मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची वर्दळ असते; मात्र सलग काही दिवसांपासून रोख रक्कम नसल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. जयंतीनिमित्त खर्चासाठी रोख रकमेची गरज असताना ही परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
दररोजच्या व्यवहारासाठी एटीएमवर अवलंबून असलेले शेतकरी, कामगार, व्यापारी तसेच ज्येष्ठ नागरिकांना आता बँक शाखांमध्ये लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. गर्दीमुळे तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त होत आहे. काही ग्राहकांनी सांगितले की, “दररोज एटीएमवर जाऊनही पैसे मिळत नाहीत. जयंतीच्या तयारीसाठी खर्च करायचा आहे; मात्र रोख मिळत नसल्याने अडचणी येत आहेत.” तर काहींनी प्रशासनाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. एटीएममध्ये वेळेवर रोख भरण्यात येत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, शहरातील इतर बँकांच्या एटीएमवर अचानक वाढलेल्या गर्दीमुळे ताण निर्माण झाला असून अनेक ठिकाणी ग्राहकांना निराश परतावे लागत आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील रोख व्यवहार व्यवस्थेवर परिणाम झाल्याचे चित्र आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्यामध्ये एटीएममध्ये नियमित रोख भरण्याची व्यवस्था करावी, अतिरिक्त एटीएम सुरू करावेत, बँक शाखांमध्ये स्वतंत्र काउंटर सुरू करावेत, पूर्णा शहरातील नागरिकांना होत असलेल्या या गैरसोयीवर तात्काळ तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत असून, आंबेडकर जयंतीसारख्या महत्त्वाच्या दिवशी नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक अमित जोंधळे यांनी सांगितले की, “सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडूनच रोख रकमेचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे एटीएममध्ये नियमितपणे पैसे भरण्यात अडचणी येत आहेत. परिस्थिती लवकरच सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, रोख उपलब्ध होताच एटीएम सेवा पूर्ववत केली जाईल.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis