‘भीमगर्जना’ कार्यक्रमातून बाबासाहेबांना संगीतमय मानवंदना
अकोला, 13 एप्रिल (हिं.स.) : सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘भीमगर्जना’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमिलाताई ओक सभागृहात सायंकाळी हा कार्
‘भीमगर्जना’ कार्यक्रमातून बाबासाहेबांना संगीतमय मानवंदना


अकोला, 13 एप्रिल (हिं.स.) : सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘भीमगर्जना’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमिलाताई ओक सभागृहात सायंकाळी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

शब्द आणि सूरांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या या मैफलीतून महामानवांना अभिवादन करण्यात आले तसेच समतेच्या विचारांचा जागर करण्यात आला. कार्यक्रमाचा शुभारंभ वसंत खडसे, पियूष गायधने, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधु जाधव, विष्णू निंबाळकर, समन्वयक सचिन गिरी आणि सहसमन्वयक अक्षय पिंपळकर यांच्या उपस्थितीत झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर गायक कुणाल भास्कर वाकोडे आणि किरण कुणाल वाकोडे यांनी ‘साजरी भीमजयंती करू’, ‘भीमा तुज प्रणाम कोटी कोटी’, ‘माझ्या भीमाची पुण्याई’ यांसारखी भीमगीते सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. प्रारंभी बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आणि सामाजिक परिवर्तनातील त्यांच्या योगदानाचा प्रभावी आढावा या कार्यक्रमातून संगीत आणि सादरीकरणाच्या माध्यमातून मांडण्यात आला.

या कार्यक्रमात विविध वादकांनीही आपली कला सादर केली. माणिकराव वानखडे यांनी सूत्रसंचालन केले, तर आकाश वानखडे आणि प्रतीक आंबेकर यांनी कोरस कलाकार म्हणून सहभाग घेतला.

हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande