
अकोला, 13 एप्रिल (हिं.स.) :
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच रणधीर सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला महानगरात सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष (भाजप) अकोला महानगरतर्फे “माझा प्रभाग - स्वच्छ प्रभाग” हे अभियान राबविण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला आहे. शहरातील स्वच्छता, नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण या उद्देशाने हे अभियान सातत्याने राबविण्यात येणार आहे.
तसेच अकोल्याची जीवनवाहिनी मानली जाणारी मोर्णा नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी “माझी नदी - माझी जबाबदारी” हा विशेष उपक्रमही हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत जनजागृती, स्वच्छता मोहिमा आणि नागरिकांचा थेट सहभाग यावर विशेष भर दिला जाणार आहे.
या उपक्रमांमुळे स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी अकोला घडविण्याचा संकल्प अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या अभियानात शहरवासीयांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर सौ. शारदा रणजित खेडकर, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, उपमहापौर अमोल सुधाकर गोगे, सभागृह नेता पवन महल्ले आणि शहराध्यक्ष जयंत मसने यांनी केले आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे