
अकोला, 13 एप्रिल (हिं.स.) :
भारतीय हवामान विभाग च्या नागपूर प्रादेशिक केंद्रातर्फे 13 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान अकोला तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाच्या सूचनेनुसार नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. तापमान अत्यंत वाढल्यास शारीरिक श्रमाची कामे करू नयेत आणि उन्हात वाहन चालवणे टाळावे. तसेच ज्वलनशील पदार्थांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.
लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना बंद किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी तहान लागली नसली तरी वारंवार पाणी पिण्यावर भर द्यावा.
उन्हाचा झटका (Heat Stroke) बसण्याची लक्षणे जसे की अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणे, सतत घाम येणे याकडे दुर्लक्ष करू नये. अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे प्रशासनाने सांगितले आहे.
तसेच पशुधन आणि पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवून त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे
--------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे