
अकोला, 13 एप्रिल (हिं.स.) :
शहरातील कचरा व्यवस्थापन सेवेत होत असलेल्या त्रुटींविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून, जिल्हा संपर्क अध्यक्ष हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वाखाली महापौरांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, शहराध्यक्ष सौरभ भगत, तसेच संतोष बोर्डे आणि हर्षल अंभोरे उपस्थित होते. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे शहरातील कचरा संकलन सेवेत गंभीर त्रुटी असल्याचा आरोप केला.
मनसेने म्हटले आहे की, अनेक भागांमध्ये नियमित कचरा उचलला जात नाही, त्यामुळे नागरिकांना स्वतःच कचरा बाहेर टाकावा लागतो. अशा परिस्थितीत नागरिकांकडून ₹600 पर्यंत शुल्क आकारणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, बंद असलेल्या घरांवरही सरसकट शुल्क लावणे चुकीचे असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे:
घरोघरी कचरा गाडीचे शुल्क तात्काळ रद्द करावे
कचरा संकलन सेवा मोफत करावी
घरोघरी कचरा उचलण्याची सेवा नियमित व प्रभावी करावी
बंद घरांवर कोणतेही शुल्क लागू करू नये
मनसेने इशारा दिला आहे की, या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. तसेच, या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाही उभारला जाईल. या मुद्द्यावर विरोधी पक्षासोबत संयुक्तपणे प्रत्येक आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार मनसेने व्यक्त केला आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे