
अकोला, 13 एप्रिल (हिं.स.) : अकोला शहरात कचरा घंटागाडी सेवेसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या वार्षिक शुल्काविरोधात विरोधकांनी पुन्हा एकदा जोरदार आंदोलन छेडले आहे. अकोला महानगरपालिका च्या सर्वसाधारण सभेदरम्यान हा प्रकार घडला.
महापालिकेची सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली होती. मात्र, प्रस्तावित शुल्कावरून विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महापौर कक्षासमोरच आंदोलन सुरू केले. यावेळी घोषणाबाजी करत प्रतिकात्मक घंटागाडी आणून सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवण्यात आला.
महापालिकेकडून शहरातील प्रत्येक घराकडून कचरा संकलनासाठी वार्षिक 600 रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याचे विरोधकांचे मत आहे.
विरोधकांनी निदर्शनास आणून दिले की, महाराष्ट्रातील अनेक महापालिकांमध्ये घराघरातून कचरा संकलनासाठी स्वतंत्र शुल्क आकारले जात नाही. हा खर्च प्रामुख्याने मालमत्ता कर व इतर स्थानिक करांमधून भागवला जातो. त्यामुळे अकोल्यात अशा प्रकारे स्वतंत्र शुल्क लादणे अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
तसेच, शहरातील कचरा व्यवस्थापन सेवा अद्याप पूर्णपणे सक्षम नसल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. योग्य सेवा न देता शुल्क आकारणे अयोग्य असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांचे मत, आक्षेप आणि सूचना विचारात घ्याव्यात, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे