
अकोला, 13 एप्रिल (हिं.स.)।अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचा निषेध करत विरोधकांनी आज आंदोलन छेडलं असताना, त्यानंतर पार पडलेली स्थायी समितीची बैठक मात्र वेगळ्याच कारणामुळे गाजली. सत्ताधारी भाजप आणि राज्यातील मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक वाद रंगला.
महानगरपालिकेत गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावावरून तसेच महापालिकेच्या दवाखान्यांसाठी औषध पुरवठा कंत्राटाच्या मुद्द्यावरून हा वाद निर्माण झाला.स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे नगरसेवक सागर भारुका यांच्यामध्ये हा वाद चांगलाच चिघळला. सागर भारुका यांनी या दोन्ही मुद्द्यांवर आक्षेप घेत विरोध दर्शवला. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली आणि परिस्थिती चिघळत गेली.दरम्यान, वाद वाढल्यानंतर सागर भारुका यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले. मात्र, मनमानी पद्धतीने दिल्या जाणाऱ्या कंत्राटाविरोधात आपला लढा कायम ठेवणार असून संबंधित कंत्राटावर स्थगिती आणण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे