
अमरावती, 13 एप्रिल (हिं.स.) : बहुआयामी आणि अजरामर स्वरांच्या जादूने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशा भोसले यांच्या रविवारी झालेल्या निधनानंतर अमरावतीतील त्यांच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळत आहे.
अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या (तत्कालिनअमरावती विद्यापीठ) तिसऱ्या दीक्षांत समारंभात 1987 साली आशा भोसले यांना डिलिट (D.Litt.) पदवी प्रदान करून सन्मानित केले होते. विद्यापीठाची स्थापना 1983 मध्ये झाली असून सुरुवातीला विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरातून त्याचे कामकाज चालत होते.
त्या वेळी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू के.जी. देशमुख यांच्या हस्ते त्यांना ही मानाची उपाधी देण्यात आली होती. तत्कालीन व्यवस्थापन मंडळ सदस्य प्रा. डॉ. डॅडी देशमुख यांच्या प्रस्तावानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.
त्या प्रसंगी आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अमरावतीकरांबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त केली होती. “आमच्या कुटुंबाच्या कठीण काळात अमरावतीकर प्रेक्षकांनी सातत्याने मदत केली,” असे त्या नेहमी सांगायच्या. तसेच, “मी इतकी शिकलेली नसतानाही विद्यापीठाने मला डिलिट देऊन गौरव केला, हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे,” असे त्यांनी नमूद केले होते.
ही आठवण सांगताना विद्यापीठाचे तत्कालीन जनसंपर्क अधिकारी प्रा. डॉ. किशोर फुले यांनी त्या काळातील प्रसंगांना उजाळा दिला. आशा भोसले यांच्या निधनाने संगीतविश्वासह अमरावतीतही हळहळ व्यक्त केली जात आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी