
खा. अशोकराव चव्हाण यांची भावपूर्ण श्रद्धांजलीनांदेड, 13 एप्रिल (हिं.स.) : “मला नांदेडला यायचं आहे, गुरुद्वारात दर्शन घ्यायचं आहे. आपण लवकरच कार्यक्रम ठरवू या,” असा शब्द देणाऱ्या स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले यांची नांदेड भेटीची इच्छा अखेर अपूर्णच राहिली, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या निधनामुळे संगीत विश्वाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आशाताईंच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करताना खा. चव्हाण यांनी त्यांच्याशी असलेल्या स्नेहबंधांना उजाळा दिला. 1990 च्या दशकात आशाताई नांदेडला आल्या होत्या, त्यानंतर पुन्हा सचखंड गुरुद्वारात दर्शनासाठी येण्याची त्यांची तीव्र इच्छा होती, असे त्यांनी नमूद केले.
एका खास प्रसंगाचा उल्लेख करताना चव्हाण म्हणाले की, कोरोना काळानंतर त्यांच्या एका स्नेह्याने प्रसाद महाडकर यांनी आशाताईंशी फोनवर बोलणे करून दिले होते. त्या वेळी त्यांनी नांदेडला येण्याची इच्छा व्यक्त केली होती. मीही त्यांना आनंदाने निमंत्रण दिले, मात्र नियतीमुळे तो योग जुळून आला नाही, अशी हळहळ त्यांनी व्यक्त केली.
नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या ‘संगीत शंकर दरबार’ कार्यक्रमासाठीही आशाताईंना निमंत्रण देण्यात आले होते. नांदेडकरांना त्यांचे जादुई सूर प्रत्यक्ष ऐकता यावेत, अशी अपेक्षा होती; मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांची उपस्थिती शक्य झाली नाही आणि ही संधी कायमची हुकली, अशी खंत खा. चव्हाण यांनी व्यक्त केली.---------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis