
डोंबिवली, 13 एप्रिल (हिं.स.)। रक्तदान हे श्रेष्ठ दान या भावनेने सामाजिक कार्यासाठी सतत सहकार्य करणाऱ्या शहरातील सागर्ली विभागातील ग्लोब पॅराडाईज सोसायटी माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्यात आले. सोसायटीमधील जागरूक रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी चिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट ब्लड सेंटरच्या डॉक्टर व सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. सोसायटीच्या सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केल्याने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
ग्लोब पॅराडाईज सोसायटीचे अध्यक्ष माधव सिंग, सेक्रेटरी तुषार फिरके, खजिनदार सुजित विश्वकर्मा तसेच इतर पदाधिकारी यांनी रक्तदानाचे महत्व व आवश्यकता हा विषय सोसायटीमधील सदस्यांसमोर मांडला होता. या विषयाला अनुसरून हा रक्तदान कार्यक्रम रविवारी घेण्यात आला. मुख्य म्हणजे थॅलेसेमिया, सिकल सेल, हिमोफिलिया अशा आजारांनी त्रस्त रुग्णांना तसेच गरजू नागरिकांना रक्ताची मोठी गरज असे खुद्द.रक्तपेढीचे डॉक्टर बिजॉय यांनी व्यक्त केले होते. डॉक्टर बिजॉय अत्यंत सेवाभावी वृत्तीने काम करत असून समाजासाठी रक्तदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा रक्तदान उपक्रम राबविला गेला.
शहरातील ग्लोब पॅराडाईज सोसायटीमध्ये या रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. ग्लोब पॅराडाईज को-ऑप. हौसिंग सोसायटी ही केवळ निवासी संकुल नसून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि सेवाभावी कार्यासाठी ओळखली जाणारी एक प्रेरणादायी सोसायटी आहे. सोसायटीमध्ये सध्या साधारण ११२ कुटुंबे वास्तव्यास असून सर्व सदस्य एकजुटीने विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतात.
ग्लोब पॅराडाईज सोसायटीचे सदस्य सामाजिक कार्याबरोबरच पर्यावरण संवर्धनातही आघाडीवर आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सोसायटीतर्फे १०० ते १२५ वृक्षारोपण करण्यात येते. गेल्या चार वर्षांपासून नेरळ, पाईपलाईन रोड, हाजी मलंग रोड, तसेच केडीएमसी ग्राऊंड अशा विविध ठिकाणी वातावरणपूरक व निसर्गाशी सुसंगत झाडे लावण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.
मागील वर्षी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट यांनी केलेल्या जागतिक विक्रमात २,०५,५८५ सीड बॉल्स तयार करण्यात आले होते. त्या उपक्रमात ग्लोब पॅराडाईज सोसायटीच्या सदस्यांनी स्वतंत्रपणे साडेसात हजार सीड बॉल्स तयार करून उल्लेखनीय योगदान दिले होते. हा सोसायटी स्तरावरील एक वेगळा विक्रम ठरला.
तसेच, गरजू, वंचित घटक, वृद्धाश्रम आणि विविध सेवाभावी संस्थांसाठी वर्षातून ३ ते ४ वेळा ‘अन्नपूर्णा’ उपक्रम राबविण्यात येतो. सोसायटीतील सदस्य प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन अन्नदान व सेवा कार्यात सहभागी होतात.
अशा विविध सामाजिक कार्यामुळे सामाजिक जाणीव, पर्यावरणपूरक दृष्टीकोन, सेवाभाव आणि एकजुटीच्या बळावर ग्लोब पॅराडाईज सोसायटी डोंबिवलीत एक वेगळी आणि आदर्श ओळख निर्माण करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi