
पुणे, 13 एप्रिल (हिं.स.)। काँग्रेसने ‘संघटन सृजन’ अभियान सुरू केले असून, त्याअंतर्गत पक्षांतर्गत बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुण्यात काँग्रेसचे शहराध्यक्षपद हा कळीचा मुद्दा असून, गटबाजी रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (ठाकरे) पक्षांप्रमाणे आता काँग्रेसही पुण्यासाठी दोन शहराध्यक्ष नेमण्याचा तोडगा काढण्याची शक्यता आहे. शहरातील आठ विधानसभा मतदार संघांपैकी प्रत्येकाकडे प्रत्येकी चार मतदार संघांची जबाबदारी देऊन मध्यममार्ग काढण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेस पक्षात ‘संघटन सृजन’ मोहिमेतून मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार आहेत. त्यानुसार राज्यात साडेसात हजार नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामध्ये बहुतांश नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. त्यानुसार पुण्यात दोन शहराध्यक्ष नेमण्याबाबत चर्चा सुरू झाल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने दोन शहराध्यक्ष नेमले आहेत. माजी आमदार सुनील टिंगरे आणि माजी नगरसेवक सुभाष जगताप हे दोन शहराध्यक्ष आहेत. शिवसेना (ठाकरे)) पक्षाचेही संजय मोरे आणि गजानन थरकुडे हे दोन शहराध्यक्ष आहेत. त्याच धर्तीवर काँग्रेसमध्येही दोन शहराध्यक्ष नेमण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु