
नांदेड, 13 एप्रिल (हिं.स.) : नायगाव तालुक्यातील राहेर येथे चक्रधर स्वामी यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली असून या निमित्ताने भरवण्यात आलेल्या जंगी कुस्त्यांच्या मैदानाने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
या कुस्त्यांमध्ये नाशिकच्या गणेश अहिरे यांनी माळकोटच्या हनमंत पैलवानाचा पराभव करत 11 हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. तर नाशिकच्या अनिल अहिरे यांनी बरबड्याच्या शुभम पैलवानावर मात करत 5 हजार रुपयांचे दुसरे बक्षीस जिंकले.
या कुस्त्यांच्या मैदानातील मुख्य आकर्षण मध्य प्रदेशातून आलेली युवती पैलवान पूर्वा ठाकरे ठरली. तिने पुरुष पैलवानाविरुद्ध प्रभावी कुस्ती खेळून विजय मिळवत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच यवतमाळच्या दिव्यांगी माने हिनेही मध्य प्रदेशातील आभा ठाकरे हिला पराभूत करत आपली छाप पाडली.
दोन्ही युवती पैलवानांच्या दमदार कामगिरीचे यात्रा कमिटी आणि प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात जोरदार कौतुक केले.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे 11 हजार रुपयांचे बक्षीस धनंजय उत्तमराव देशमुख यांच्या वतीने, त्यांच्या दिवंगत वडिल उत्तमराव देशमुख यांच्या स्मरणार्थ देण्यात आले. यात्रा परिसरात दिवसभर उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis