चंद्रपूरमध्ये पाच आदिवासी शेतकऱ्यांचे उपविभागीय कार्यालयात विषप्राशन
चंद्रपूर, 13 एप्रिल (हिं.स.)। कोरपना तालुक्यातील माणिकगड सिमेंट (अल्ट्राटेक) कंपनीच्या चुनखडी क्षेत्रासाठी जमिनी देऊनही मोबदला न मिळाल्याप्रकरणी कुसुंबी येथील पाच आदिवासी शेतकऱ्यांनी राजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा
चंद्रपूरमध्ये पाच आदिवासी शेतकऱ्यांचे उपविभागीय कार्यालयात विषप्राशन


चंद्रपूर, 13 एप्रिल (हिं.स.)। कोरपना तालुक्यातील माणिकगड सिमेंट (अल्ट्राटेक) कंपनीच्या चुनखडी क्षेत्रासाठी जमिनी देऊनही मोबदला न मिळाल्याप्रकरणी कुसुंबी येथील पाच आदिवासी शेतकऱ्यांनी राजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी घडली.

राजुरा उमविभाअंतर्गत येणाऱ्या कोरपना तालुक्यातील कुसुंबी येथील कोलाम कुटुंबाच्या जमिनी माणिकगड सिमेंट कंपनीने आपल्या चुनखडी प्रकल्पासाठी अधिग्रहीत केल्या होत्या. मात्र या जमिनिंचा योग्य मोबदला अद्याप मिळालेला नाही. एकतर मोबादला द्या किंवा आमच्या जमिनी परत करा या मागणीसाठी हे आदिवासी शेतकरी गेल्या 15 वर्षांपासून कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा निघत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी आज टोकाचे पाऊल उचलले.

पाचही शेतकरी राजुरा उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांच्या कार्यालयात आपली व्यथा घेऊन आले होते. तिथेच त्यांनी विष पिले. हा प्रकार लक्षात येताच कार्यालयात मोठी खळबळ उडाली. राजुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाचही जणांना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande