
चंद्रपूर, 13 एप्रिल (हिं.स.) : चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथे सोमवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. मोहफुले वेचण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या 65 वर्षीय महिलेवर वाघाने अचानक हल्ला करून तिचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत महिलेचे नाव वच्छला ईश्वर वाडगुरे (वय 65) असे आहे. त्या गुंजेवाही येथील महसूल क्षेत्रात मोहफुले वेचण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. वाघाने त्यांना ओढत काही अंतर नेल्याची माहिती मिळाली आहे.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत वच्छला वाडगुरे यांचा मृत्यू झाला होता.यानंतर पोलिस आणि वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव