ई-बस सेवेत दिव्यांग सवलत लागू नसल्याचा आरोप; मंत्रालयाकडे तक्रार दाखल
नांदेड, 13 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत चालवल्या जाणाऱ्या ई-बस सेवेत दिव्यांग प्रवाशांना प्रवास सवलत दिली जात नसल्याचा आरोप समोर आला आहे. याबाबत माहूर येथील दिव्यांग नागरिक मोहम्मद जिया मोहम्मद उस्मान फारुखी आणि क
ई-बस सेवेत दिव्यांग सवलत लागू नसल्याचा आरोप; मंत्रालयाकडे तक्रार दाखल


नांदेड, 13 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत चालवल्या जाणाऱ्या ई-बस सेवेत दिव्यांग प्रवाशांना प्रवास सवलत दिली जात नसल्याचा आरोप समोर आला आहे. याबाबत माहूर येथील दिव्यांग नागरिक मोहम्मद जिया मोहम्मद उस्मान फारुखी आणि कुणाल मस्के यांनी दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय (मुंबई) येथे लेखी निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वैध दिव्यांग प्रमाणपत्र आणि यूडीआयडी कार्ड असूनही सध्या एसटी महामंडळाच्या पारंपरिक बस सेवेत मिळणारी सवलत ई-बस सेवेत लागू केली जात नाही. नव्याने सुरू करण्यात आलेल्या हिरव्या रंगाच्या ई-बस सेवेत दिव्यांग सवलतीचा कोणताही पर्याय तिकीट यंत्रणेत उपलब्ध नसल्याचे वाहकांकडून सांगितले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भारतीय दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिनियम 2016 मधील कलम 41 नुसार दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक वाहतूक सेवांमध्ये सवलत व सुलभता उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ई-बस सेवेत सवलत न देणे हे कायद्याच्या तरतुदींना विरोधात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, सवलत नसल्याने दिव्यांग प्रवाशांना पूर्ण तिकीट दर भरून प्रवास करावा लागत असून ही बाब अन्यायकारक व गैरसोयीची असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे. यावर तातडीने उपाययोजना करून ई-बस सेवेतही दिव्यांग सवलत लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande