
कोल्हापूर, 13 एप्रिल (हिं.स.) : काँग्रेस पक्षाकडून 13 ते 18 एप्रिल या कालावधीत जिल्हाभर ‘संघटन सृजन अभियान’ राबविण्यात येत असून, या उपक्रमाची सुरुवात आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये मोठ्या उत्साहात झाली.
या कार्यक्रमाला खासदार शाहू छत्रपती महाराज, खासदार प्रतिभाताई धानोरकर, केंद्रीय निरीक्षक जयशंकर पाठक, राष्ट्रीय सचिव सचिन सावंत, जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान संवाद सत्र व आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये पक्षाच्या आगामी संघटनात्मक धोरणांवर, स्थानिक पातळीवरील आव्हानांवर आणि त्यावरील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पत्रकारांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी पक्षाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. तसेच काही ठिकाणी पदाधिकारी बदलाची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तालुका पातळीवर तरुण कार्यकर्त्यांना अधिक संधी देण्याचे संकेत त्यांनी दिले.
राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनी काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांमुळे पक्षाचे ‘शुद्धीकरण’ झाले असून आता संघटन बळकटीवर लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे सांगितले. हे अभियान म्हणजे 2029 च्या निवडणुकांची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. शहराध्यक्ष सचिन चव्हाण, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, विविध नगरसेवक, निरीक्षक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कोल्हापुरात सुरू झालेले हे संघटन सृजन अभियान पुढील काही दिवस जिल्हाभर विविध स्तरांवर राबविण्यात येणार आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar