
छत्रपती संभाजीनगर, 13 एप्रिल (हिं.स.)।दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शहरासह जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कालावधीत शहरातील २४ त्रिकाल आरती केंद्रांसह जिल्ह्यातील तब्बल १३० सेवा केंद्रांवर अखंड नामजप, यज्ञ व पारायण सोहळे पार पडत आहे. या सप्ताहात गणेश, मनोबोध, रुद्र, स्वामी, चंडी, मल्हारी व गीताई यांसारख्या विविध यज्ञांचे आयोजन करण्यात आले असून, हजारो सेवेकरी सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायणात सहभागी होणार आहेत.
तसेच स्वामी चरित्र, दुर्गा सप्तशती, नवनाथ, भागवत, श्रीपाद श्रीवल्लभ आदी पवित्र ग्रंथांचे वाचन होणार आहे. यासोबतच सामुदायिक स्वरूपात स्वामी मंत्र, गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र व नवार्णव मंत्रांचा अखंड जप करण्यात येणार आहे. सप्ताहादरम्यान विविध सामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक सेवा केंद्रावर रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, विवाह नोंदणी, बालसंस्कार वर्ग तसेच मोफत कायदेशीर सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात
आले आहे. विशेष म्हणजे, सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत महिलांचे प्रहर तर सायंकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत पुरुषांचे प्रहर असे २४ तास अखंड सेवा सुरू राहणार आहे. प्रत्येक प्रहरात दोन जण विना वादन, दोन जण माळा जप आणि दोन जण स्वामी चरित्र वाचन करणार असून अखंड सेवा चालू ठेवली जाणार आहे. सद्यस्थितीत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशावर येणारी संभाव्य संकटे दूर व्हावीत, यासाठी प.पू. गुरुमाऊली यांच्या सूचनेनुसार सामुदायिक दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करण्यात येणार आहे. या उपक्रमात संपूर्ण महाराष्ट्रभर लाखो भाविक सहभागी होणार आहेत. या सप्ताहाची सांगता १५ एप्रिल रोजी सत्यदत्त पूजनानंतर महाप्रसादाने करण्यात येणार असल्याची माहिती सेवा मागाचें शशी पाटील यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis