
छत्रपती संभाजीनगर, 13 एप्रिल (हिं.स.) : तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असतानाही शहरातील पालेभाज्या व फळभाज्यांची आवक चांगली असल्याने बहुतांश भाज्यांचे दर स्थिर किंवा घसरले असल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे. मात्र लिंबाच्या दरात मोठी वाढ झाल्याने ते किरकोळ बाजारात 200 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.
कोथिंबीर आणि मेथीच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून 10 रुपयांना मिळणारी कोथिंबीरची गड्डी आता 20 रुपयांना मिळत आहे. तसेच मेथीची जुडीही 10 रुपयांवरून 20 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
लिंबाला रसवंतीगृहे, हॉटेल व्यावसायिक तसेच घरगुती वापरासाठी मोठी मागणी असल्याने दर वाढले आहेत. आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात लिंबाचे दर 200 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.
दुसरीकडे शेवगा शेंग, गवार, बटाटा, टोमॅटो आणि हिरवी मिरची यांसारख्या फळभाज्यांचे दर घसरले असून ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत सामान्यतः आवक कमी होऊन दर वाढतात, मात्र यंदा चित्र वेगळे असून पुरवठा चांगला असल्याने दर नियंत्रणात आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी 14 क्विंटल लिंबाची आवक झाली. लिंबाला किमान 11 हजार ते कमाल 16 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. मागणी वाढल्याने आणि आवक घटल्याने लिंबाच्या दरात मोठी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, पुढील काळात आवक कमी झाल्यास भाज्यांच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis