
रायगड, 13 एप्रिल (हिं.स.) : रायगड जिल्ह्यातील नागाव बिच येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नागाव ग्रामपंचायतीने ‘रोबो रक्षक’ तैनात करून एक अभिनव आणि अत्याधुनिक उपक्रम राबविला आहे. सागरी किनाऱ्यांवर वाढत्या बुडण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, असा उपक्रम राबविणारी नागाव ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
रायगड जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असून, सुमारे २४० किलोमीटरचा समुद्रकिनारा येथे आहे. अलिबाग, काशिद बिच, मुरूड, श्रीवर्धन आणि दीवेघर या किनाऱ्यांवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र, भरतीच्या वेळी सुरक्षेच्या सूचना दुर्लक्षित केल्याने बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने अत्याधुनिक उपाययोजना म्हणून ‘रोबो रक्षक’ उपलब्ध करून दिला आहे. हा रोबो रिमोटद्वारे नियंत्रित केला जातो आणि समुद्रात अडकलेल्या व्यक्तीपर्यंत अतिशय वेगाने पोहोचू शकतो. सुमारे ८०० मीटरपेक्षा अधिक अंतर सहज पार करण्याची त्याची क्षमता असल्यामुळे मानवी जीव रक्षकांना स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची गरज कमी होणार आहे.
या रोबोचे प्रात्यक्षिक पोलीस मुख्यालयात तसेच अलिबाग समुद्रकिनारी सादर करण्यात आले. यावेळी सरपंच हर्षदा मयेकर आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. भविष्यात काशिद बिच आणि श्रीवर्धन येथेही अशा रोबो रक्षकांची तैनाती करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.
नागावसारख्या पर्यटनस्थळी हा उपक्रम पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा ठरणार असला, तरी त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि आवश्यक निधीची तरतूद करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)