
नांदेड, 13 एप्रिल (हिं.स.) : विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी येणारी विधिमंडळ अंदाज समिती हदगाव तालुक्याकडे फिरकलीच नसल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अनेक गंभीर तक्रारी आणि कथित गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर समितीचा दौरा अपेक्षित असताना तो रद्द झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हदगाव तालुक्यात जलजीवन मिशन, दलित वस्ती विकास योजना, पुरवठा विभाग, कामगार विभाग, घरकुल योजना तसेच मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि कथित घोटाळे झाल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. शेतकऱ्यांच्या इंधन विहिरींच्या कामांमध्येही गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे.
याशिवाय तालुक्यात अवैध व्यवसायांना ऊत आल्याचे चित्र असून मटका, गुटखा विक्री, तसेच गौण खनिज उत्खनन आणि नदीघाटांवरील अवैध रेती उपसा सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात येत आहेत. रेल्वे कामांच्या नावाखाली अवैध मुरूम उत्खनन होत असल्याचेही आरोप होत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर विधिमंडळ अंदाज समितीने प्रत्यक्ष पाहणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. मात्र समितीचा दौरा रद्द झाल्याने या प्रकरणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, समिती हदगावला न आल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत असून दौऱ्यासाठी आवश्यक पाठपुरावा का झाला नाही, असा सवालही नागरिकांकडून केला जात आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis