
भूसंपादन प्रक्रिया जलद पूर्ण करण्याचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर, 13 एप्रिल (हिं.स.) : हिंगोली व परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील येलदरी येथे पूर्णा नदीवर जर्मन तंत्रज्ञानावर आधारित उभारण्यात आलेल्या केबल स्टेड पुलाच्या कामाची तसेच संबंधित भूसंपादन प्रक्रियेची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी तसेच स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा केली.
पुलाच्या उर्वरित कामांना गती देण्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तसेच पुलाला जोडणारा रस्ता विकसित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी सविस्तर चर्चा केली. प्रकल्पाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या नियोजनावरही यावेळी भर देण्यात आला.
पुलासाठी ज्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत तसेच ज्या शेतकऱ्यांची भूसंपादन प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे, अशा सर्व प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केले.
तसेच आतापर्यंत भूसंपादन व रस्ते विकासाबाबत झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेऊन पुढील नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी येलदरी येथील जलविद्युत प्रकल्पालाही भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
या वेळी उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis