
पुणे, 13 एप्रिल (हिं.स.) : विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयुक्त कविता द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विभागीय लोकशाही दिनात दोन नव्याने दाखल प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली.
यावेळी अपर आयुक्त तुषार ठोंबरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि संबंधित तक्रारदार उपस्थित होते. विभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी व अडचणींना न्याय्य आणि तत्पर पद्धतीने समाधान देण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते.
या लोकशाही दिनात दाखल झालेल्या दोन्ही प्रकरणांमध्ये अर्जदारांना तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर अपर आयुक्त कविता द्विवेदी यांनी दोन्ही प्रकरणांची सविस्तर सुनावणी घेतली.
शासन यंत्रणेमार्फत नागरिकांच्या तक्रारींचे जलद आणि प्रभावी निराकरण व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु