
बीड, 13 एप्रिल (हिं.स.)।
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा महोत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पेठ बीड पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर, पोलीस रेकॉर्डवरील बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या ११ इसमांना बीड तालुका हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. पेठ बीड पोलीस ठाण्याने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३(३) अन्वये हे प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले आहेत. संबंधित व्यक्तींनी या कालावधीत परिसरात प्रवेश केल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती खेडकर व त्यांच्या पथकाने केली असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis