
नांदेड, 13 एप्रिल (हिं.स.) : साडेतीनशेहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या महादेव काठीचे सगरोळी (ता. बिलोली) येथे मोठ्या उत्साहात आगमन झाले. काठीच्या आगमनासोबतच वार्षिक जत्रेला उत्साहपूर्ण सुरुवात झाली असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.
महादेव काठीच्या आगमनानंतर दरवर्षीप्रमाणे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवारी अंबिल व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने भाविकांसाठी अन्नदान करण्यात आले. तसेच आयोजित रक्तदान शिबिरात 25 भाविकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
ग्रामपंचायतीतर्फे आयोजित पशू प्रदर्शनालाही शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात 25 गायी, 9 बैलजोड्या, 15 कालवडी व वासरे तसेच 6 गोरे असे एकूण 55 पशुधन सहभागी झाले होते. पशुधन विकास अधिकाऱ्यांनी या प्रदर्शनाचे परीक्षण केले.
जत्रेनिमित्त सगरोळी व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महादेव काठीचे दर्शन घेतले. माहेरवाशिणींची उपस्थितीही लक्षणीय होती. लहान मुलांसाठी खेळणी, मिठाईचे स्टॉल्स आणि विविध मनोरंजनाच्या साधनांमुळे यात्रेचे वातावरण अधिक रंगतदार बनले.
विशेष म्हणजे, सगरोळी येथून शिखर शिंगणापूरकडे सुमारे एक हजार भाविकांसह प्रस्थान केलेली महादेव काठी 28 दिवसांच्या पदयात्रेनंतर पुन्हा गावात परतली. सुमारे 21 फूट उंच आणि 33 किलो वजनाची ही काठी संपूर्ण प्रवासात दोन भाविकांकडून खांद्यावर उभी वाहिली जाते. सुमारे 40 अंश तापमानातही अखंड श्रद्धेने हा प्रवास पूर्ण करण्यात आला, अशी माहिती भाविकांनी दिली.
या ऐतिहासिक परंपरेमुळे सगरोळीतील जत्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis