
नाशिक, 13 एप्रिल (हिं.स.)।
- शहर परिसरात चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चार मुलींचे अज्ञात इसमांनी अपहरण केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंदी करण्यात आल्या आहेत.
अपहरणाचा पहिला प्रकार पंचवटीत घडला. फिर्यादी हे समर्थनगर परिसरात राहतात. त्यांची अल्पवयीन मुलगी ही घरी असताना अज्ञात इसमाने या मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
अपहरणाचा दुसरा प्रकार मखमलाबाद येथे घडला. फिर्यादी हे मखमलाबाद येथे मानकर मळा परिसरात राहतात. दि. ११ एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास फिर्यादीचे सर्व कुटुंबीय जेवण करून झोपले होते. त्यादरम्यान कुटुंबासोबत झोपलेल्या त्यांच्या मुलीला संशयित सतीश वाळू भांगरे (वय २०, रा. हिरावाडी, पंचवटी) याने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले, तसेच घरातून जाताना या मुलीने घरात ठेवलेले दीड लाख रुपये
सोबत नेले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयित सतीश भांगरेविरुद्ध मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर करीत आहेत.
अपहरणाचा तिसरा प्रकार सिडकोत घडला. फिर्यादी हे अंबड परिसरात स्वामीनगर येथे राहतात. काल (दि. १२) त्यांची भाची ही सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घरी होती. या मुलीला कोणी तरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत.
अपहरणाचा चौथा प्रकार दाढेगाव शिवारात घडला. फिर्यादी यांची मुलगी काल (दि. १२) सकाळी १० वाजेच्या सुमारास घरात कोणालाही काहीही न सांगता कुठे तरी निघून गेली. या मुलीचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ही मुलगी मिळून आली नाही. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सपकाळे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV