
परभणी, 13 एप्रिल (हिं.स.)।
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्या गंगाखेड आगाराचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला असून, गंगाखेड–लोहा मार्गावरील बससेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. बस वेळेवर न सुटल्यामुळे प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
दररोज या मार्गावरून प्रवास करणारे विद्यार्थी, कामगार व व्यापारी यांना याचा मोठा फटका बसत आहे. बसचे निश्चित वेळापत्रक नसल्याने प्रवाशांची गैरसोय वाढली असून, अनेकांना आपली कामे उशिरा पार पाडावी लागत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गंगाखेड–लोहा मार्गावर बसांची संख्या अपुरी आहे. त्यातही उपलब्ध गाड्या वेळेवर सोडल्या जात नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. परिणामी, प्रवाशांना खासगी वाहनांचा पर्याय निवडावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे बस सेवा नियमित करण्याची, वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्याची तसेच अतिरिक्त गाड्या सुरू करण्याची मागणी केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis