रत्नागिरीत पद्मश्री परशुराम गंगावणे यांची चित्रकथीची कार्यशाळा
रत्नागिरी, 13 एप्रिल, (हिं. स.) : येथील उज्ज्वल शिक्षण मंडळ संचालित आगम द कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट या कॉलेजमध्ये पद्मश्री परशुराम गंगावणे यांची चित्रकथीची कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेसाठी तालुक्यातील दहावी आणि त्यापुढील विद्यार्थी सहभागी झा
परशुराम गंगावणे यांची रत्नागिरीत कार्यशाळा


रत्नागिरी, 13 एप्रिल, (हिं. स.) : येथील उज्ज्वल शिक्षण मंडळ संचालित आगम द कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट या कॉलेजमध्ये पद्मश्री परशुराम गंगावणे यांची चित्रकथीची कार्यशाळा उत्साहात पार पडली.

कार्यशाळेसाठी तालुक्यातील दहावी आणि त्यापुढील विद्यार्थी सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चित्रकथी ही पारंपरिक लोककला असून त्याविषयीची अधिक माहिती व इतिहास समजून घेण्यासाठी परशुराम गंगावणे यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत चित्रकथीची सुरुवात आणि प्रवास, चित्रकथी सादरीकरण करण्याची संपूर्ण प्रक्रिया कशी असते, चित्रकथी म्हणजे काय, बदलते युग आणि तंत्रज्ञान, आजच्या डिजिटल युगात लोककलेचे स्थान तुम्ही कसे पाहता, अशा प्रश्नांमधून चित्रकथीचे अनेक पैलू विद्यार्थ्यांसमोर उलगडले. त्यांना अनमोल मार्गदर्शन झाले. एकनाथ गंगावणे यांनी मुलांना चित्रकथीचे प्रात्यक्षिक दाखवून मुलांना रेखाटन आणि रंगकाम याबाबत मार्गदर्शन केले.

संस्थेचे संचालक सुहास भोळे, विनायक हातखंबकर, उदय शिंदे यांच्या हस्ते पद्मश्री गंगावणे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. एकनाथ गंगावणे, डॉ. शशांक पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. पद्मश्री गंगावणे यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.कार्यशाळेतून लोककलेबाबत जनजागृती करण्यात आली. त्याच बरोबर पारंपरिकता ते आधुनिकता यामध्ये कलेचा संगम कसा करावा, यावर विचारमंथन झाले.कार्यक्रमाचे नियोजन संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक प्रा. संदेश पालये यांनी केले होते. या कार्यक्रमास संतोष गोरीवले, मकरंद राणे, भाविका देवरूखकर, नीलेश शिळकर, विजय पडावे, मधुरा घारपुरे आदी मान्यवर आणि विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande